अशोक कारखान्याने सभासदांच्या सर्वच बँकातील कर्ज भरावे
शेतकरी संघटनेची मागणी
श्रीरामपूर : निवडणुक मतदानासाठी आवश्यक असलेल्या अटीच्या नावाखाली अशोक सहकारी कारखाना प्रशासनाने अनेक सभासदांची अशोक सहकारी बँकेतील लाखों रूपयांची कर्जे भरली आहेत. यात सभासदांच्या हिता पेक्षा ही बँक माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याच ताब्यात असल्याने हा स्वार्थ साधला असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. त्यांना सभासदांचा खरच पुळका असेल तर सभासदांची इतर राष्ट्रीयकृत बँकेतील सर्व कर्जे भरावीत अशी मागणी तालुकाध्यक्ष अनिल औताडे, युवराज जगताप यांनी केली आहे.
कारखाना निवडणुकीसाठी प्रारूप यादी जाहीर झाली असून १२ नोव्हेंबर पर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. एकूण सभासदांपैकी ८१४ जणांना मतदानासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. निवडणूकीत सहभाग घेण्यासाठी सभासदांवर कुठलीही थकबाकी असता कामा नये अशी अट आहे. बहुतांश सभासद हे अशोक बँकेचे थकबाकीदार होते. त्यांचे कर्ज कारखान्याने परस्पर भरले. त्यामुळे ते अपात्र ठरले नाहीत. मात्र इतर ८१४ कारखाना थकबाकीदारांना अपात्र ठविण्यात आले. अशोक बँक माजी आमदार मुरकुटे यांच्या ताब्यात असल्याने कर्ज भरण्याची जी चपळाई कारखाना प्रशासनाने दाखवली त्याच चपळाईने सभासदांची इतर बँक थकबाकीही भरावी, अशी मागणी पत्रकात करण्यात आली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, आम्ही कार्यकारी संचालकांकडे अपात्र मतदार यादी मागणी केली मात्र संचालक मंडळाच्या सांगण्यावरून यादी देण्यात टाळाटाळ केली जात आहे. या यादीतील बहुतांश सभासद हे प्रत्यक्ष कारखाना थकबाकी, बेणे हमी, मळी, खते यापैकी कुठलीही बाकी नसून सदर थकबाक्या या अशोक बँकेच्या बहुतांश सभासदांच्या असल्याचे दिसून आले आहे. उंदिरगाव गटातील महांकाळ वाडगाव येथील इंद्रभान बाळासाहेब चोरमल या शेतकरी सभासदाकडे कारखान्याची कुठलीही बाकी नसताना मतदार यादीतून अशोक बँकेचे कर्ज असल्याने अपात्र केले आहे. ८१४ सभासदांचे मतदान विरोधात जाण्याच्या भितीने संचालक मंडळाने मनमानी पद्धतीने अपात्र ठरविले आहे. ही आडमुठी भुमिका असून सभासदांवर अन्याय केला जात आहे. तरी प्रत्यक्ष सुनावणी वेळी अपात्र सभासदांचा खाते उतारा माहितीकामी आणण्यासाठी कारखान्यास कळवावे. कारखाना बाकी असल्याचे सबळ पुरावे संबंधितांकडून सादर न झाल्यास अपात्र ठरविलेल्या सभासदांना मतदानाचा अधिकार द्यावा, अशी मागणी पत्रकात करण्यात आली आहे. पत्रकावर अनिल औताडे, युवराज जगताप, शरद पवार आदींच्या सह्यात आहेत.
अशोक बँक थकबाकीदारांचा कारखान्याने केलेला भरना हा कारखाना संचालक मंडळ व सर्वसाधारण सभेच्या पुर्वपरवानगी शिवाय केवळ कर्ज हमीपोटी केला आहे. ही रक्कम कोट्यवधी रूपयांच्या घरात असून या प्रकरणी लेखापालामार्फत चौकशी नेमावी अशी मागणी औताडे व जगताप यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment