कायदा क्षेत्रात युवकांना रोजगार संधी : डॉ. ज्योती शिंदे
श्रीरामपूर (प्रतिनिधी): कायदा क्षेत्र हे प्रत्येकाच्या जीवनात महत्वाचे असून वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना त्यातून करीयरच्या भरघोस संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनी महत्त्वाच्या वेबसाइट्स, जाहिराती व वर्तमानपत्रे यांचे वाचन केले तर ताज्या घडामोडींविषयी माहिती होऊन त्यांचे करियर विषयक ज्ञान वाढेल असे प्रतिपादन खासदार गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाच्या समन्वयक, डॉ. ज्योती शिंदे यांनी केले. त्या येथील चंद्ररुप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्सच्या रोजगार मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना कायदा क्षेत्रातील संधी या विषयावर मार्गदर्शन करत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, कायद्याचे क्षेत्र हे खूप व्यापक असून विविध उद्योग उभारणीचे नियम, जमा - खर्च तपशील, मनुष्यबळ व्यवस्थापन, नोकरिविषयक कायदे इ. गोष्टींचे ज्ञान असणे गरजेचे असते. उद्योग उभारणी करताना कर्ज घ्यावयाचे असल्यास आवश्यक कागदपत्रे, नियम व प्रमाणपत्रे यांची पूर्तता करणे अत्यावश्यक असते. तसेच औद्योगिक कायद्याविषयी सखोल माहिती असणे नवउद्योजकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर यांनी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या रोजगार मार्गदर्शनाविषयी घेत असलेल्या परिश्रमाबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातच स्वयंरोजगार अथवा नोकरीच्या क्षेत्रामध्ये माहिती गोळा करणे चालू ठेवले पाहिजे. त्यासाठी महाविद्यालय विविध क्षेत्र भेटी, प्रकल्प व उद्योजकांची व्याख्याने आयोजित करत असल्याची त्यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वृषाली धोंगडे यांनी केले तर आभार प्रा. प्रमोदकुमार राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक प्रा. विजय दळवी, प्रा. बापूसाहेब मांडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा