Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

तक्रार निवारण दिनी नागरिकांच्या तक्रारी; खरंच निवारण होणार का? नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह


जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचा श्रीरामपूर दौरा; प्रलंबित प्रकरणांवर ठोस कारवाईची नागरिकांची अपेक्षा

श्रीरामपूर | प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर येथे तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी विविध नागरिकांनी आपल्या तक्रारी आणि समस्या पोलीस प्रशासनासमोर मांडल्या. मात्र, तक्रारी ऐकून घेण्यात आल्यानंतर त्यांचे प्रत्यक्षात कितपत निवारण होणार, असा प्रश्न काही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथील रहिवासी नसीर सलीम शेख यांनीही त्यांच्या घरावर मध्यरात्री काही अनोळखी व्यक्तींनी कथितपणे दांडक्याने दरवाजा ठोठावत घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केली आहे. या प्रकरणात तक्रार करूनही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा दावा करत त्यांनी तक्रार निवारण दिनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दाद मागितली.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, २८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री सुमारे १.३० वाजता ते कुटुंबीयांसह घरात असताना काही अनोळखी व्यक्तींनी घराच्या दरवाजावर लाकडी दांडक्याने मारल्याचा आवाज आला. घराबाहेरून धमकीवजा शब्द ऐकू आल्याचे तसेच घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

संबंधित व्यक्तींनी खिडकीतून धारदार वस्तूने वार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे. घटनेचे CCTV फुटेज उपलब्ध असल्याचे तसेच घटनास्थळी लाकडी दांडके आढळल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या आरोपांची सत्यता पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, नुकत्याच घडलेल्या आकाश दुबे हत्या प्रकरणानंतर श्रीरामपूर शहरात विविध समाजबांधवांकडून निषेध व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणात नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र, या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे ठोस कारवाई झाली का, याबाबत काही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

याच पार्श्वभूमीवर काही नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाच्या कार्यवाहीबाबत प्रश्न निर्माण झाले असून, तक्रार निवारण दिनात तक्रारी स्वीकारल्यानंतर त्यांचे प्रत्यक्षात कितपत निवारण होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. ‘तक्रार दिल्यानंतर तिचे निवारण होणार का?’ असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.

तक्रार निवारण दिनी मांडलेल्या तक्रारींची चौकशी करून संबंधित प्रकरणांमध्ये कायद्यानुसार आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, नसीर शेख यांच्या तक्रारीबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याचे तोंडी आश्वासन दिल्याचे तक्रारदाराने सांगितले.

आता या तक्रारींचे प्रत्यक्षात निवारण होते का, संबंधित प्रकरणांमध्ये तपासाला गती मिळते का आणि नागरिकांच्या प्रश्नांना अधिकृत उत्तर मिळते का, याकडे श्रीरामपूरकरांचे लक्ष लागले आहे.
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात