एकलहरे परिसरात पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ; शेळीवर हल्ला, गंभीर जखमी
एकलहरे (ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर), दि. ३० जुलै : एकलहरे परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सलीम शेख यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात शेळी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे, 14 ऑगस्ट 2025 रोजीही याच परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातल्याची घटना घडली होती. त्यानंतर काही काळ परिस्थिती शांत होती. मात्र आजच्या घटनेमुळे पुन्हा एकदा ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासनाला कळविण्यात आली. परिसरात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे, शेतात जाताना समूहाने जावे तसेच जनावरे सुरक्षित गोठ्यात बांधावीत, असे सांगण्यात आले आहे.
एकलहरे परिसरात यापूर्वीही बिबट्याचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, बिबट्याचा वावर दिसल्यास कोणत्याही प्रकारे त्याला घेरण्याचा किंवा हाकलण्याचा प्रयत्न करू नये. सुरक्षित अंतर राखून तात्काळ संबंधित प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेमुळे एकलहरे व परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा