एकलहरेमध्ये चोरीचे सत्र सुरूच! दोन दिवसांचा अंतराचा पॅटर्न चर्चेत; आधी घरफोडी, नंतर शेळी चोरीचा प्रयत्न, आता दोन गाड्या पळवण्याचा डाव!
२४ ऑगस्टपासून एकलहरेमध्ये चोरीच्या घटनांची मालिका; आज तिसरी घटना!
आधी घरफोडी, नंतर शेळी चोरीचा प्रयत्न; आता दोन वाहने पळवण्याचा डाव — ग्रामस्थांच्या सतर्कतेने प्रयत्न फसला
एकलहरे : श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथे आज दिनांक २९ऑगस्ट २६ रोजी दोन गाड्या पसार करण्याचा प्रयत्न झाला मात्र २४ ऑगस्ट २०२६ पासून एकलहरे गावात चोरीच्या घटना आणि चोरीच्या प्रयत्नांची मालिका सुरू असल्याचे चित्र आहे. २४ ऑगस्टपासून आजपर्यंत तिसरी घटना समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
२४ ऑगस्ट रोजी सोसायटीच्या चेअरमन यांच्या घराची घरफोडी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर दोन दिवसांनी शेळ्या चोरण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली. आता पुन्हा दोन दिवसांच्या अंतराने दोन वाहने घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आजच्या घटनेत ग्रामस्थांना संशयास्पद हालचाली जाणवताच त्यांनी सतर्कता दाखवली. तत्काळ ११२ क्रमांकावर पोलिसांना माहिती देण्यात आली. कॉल मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले; मात्र तोपर्यंत संबंधित संशयित घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन दिवसांच्या अंतराने घटना; ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण
२४ ऑगस्टपासून समोर आलेल्या घटनांचा क्रम पाहता दोन-दोन दिवसांच्या अंतराने घटना घडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा योगायोग आहे की चोरीच्या घटनांमध्ये काही ठरावीक पॅटर्न आहे, याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे गावातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे आणि मागील घटनांचा तपास जलदगतीने करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान, तिन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध आहे किंवा नाही, याबाबत अधिकृत तपासानंतरच स्पष्टता होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा