एकलहरे येथे सेवा सोसायटीच्या चेअरमनच्या बंगल्यात चोरी; घरातील साहित्याची नासधूस
एकलहरे (प्रतिनिधी) —श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथील सेवा सोसायटीचे चेअरमन अन्सार भाई जहागीरदार यांच्या बंगल्यात चोरीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत घरातील सोने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे सांगण्यात येत असून, घरातील काही साहित्याची नासधूस झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
घटनेनंतर घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, त्यामध्ये संशयित व्यक्ती दिसून येत असल्याची माहिती आहे. संबंधित व्यक्तीची ओळख व चोरीतील सहभाग याबाबत अधिकृत तपासानंतरच स्पष्टता होणार आहे.
चोरीच्या घटनेदरम्यान घरातील वस्तू अस्ताव्यस्त करण्यात आल्याचे दिसून आले. धान्याच्या गोण्या, घरातील साहित्य आदींची नासधूस झाल्याचे सांगण्यात येते. मात्र घरातील LED टीव्ही, फ्रीज तसेच इतर काही मौल्यवान वस्तू जागेवरच असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, चोरीस गेलेल्या सोने व रोख रकमेची नेमकी किंमत किती आहे, याबाबत अधिकृत पंचनामा व तपासानंतरच निश्चित माहिती उपलब्ध होणार आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजसह इतर बाबींच्या आधारे तपास सुरू केल्याची माहिती आहे. या प्रकरणात नेमका कोणाचा सहभाग आहे, हे पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
टीप : या बातमीत कोणत्याही व्यक्तीला चोर किंवा आरोपी म्हणून घोषित केलेले नाही. सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती केवळ ‘संशयित’ म्हणून नमूद करण्यात आली आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा