Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘स्वयंपाकी’ पदासाठी भरती; १० सप्टेंबरपर्यंत अर्जाची मुदत



छत्रपती संभाजीनगर : मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद आस्थापनेवर ‘स्वयंपाकी’ पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी निवड यादीतील १७ उमेदवारांची तसेच ४ उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

जाहिरात क्रमांक प्रशासन/१४२०/२०२६, दिनांक १७ ऑगस्ट २०२६ नुसार, या पदासाठी सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मॅट्रिक्स S-3 (रुपये १६,६०० ते ५२,४००) तसेच नियमानुसार देय भत्ते राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या पदासाठी उमेदवार किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, उमेदवाराला मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे. तसेच स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व अनुभव असणे अपेक्षित आहे. शाकाहारी तसेच मांसाहारी खाद्यपदार्थ तयार करता येणे हीदेखील पात्रतेतील महत्त्वाची अट आहे.

जाहिरातीनुसार, मान्यताप्राप्त संस्थेचे स्वयंपाक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र, तसेच स्वयंपाकाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. कुकींगमधील पदवी किंवा पदविका अथवा पंचतारांकित/त्रितारांकित हॉटेल किंवा मान्यताप्राप्त संस्थेत शेफ/स्वयंपाकी म्हणून दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याचे नमूद करण्यात आले आहे.

उमेदवाराचे वय जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेला १८ वर्षांपेक्षा कमी आणि ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे असल्याचे जाहिरातीत नमूद आहे. न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादेबाबत स्वतंत्र तरतूद देण्यात आली आहे.

भरती प्रक्रियेत स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि तोंडी मुलाखत घेण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी एकूण ५० गुण असून, स्वयंपाकाच्या प्रात्यक्षिक परीक्षेस ३०, शारीरिक कार्यक्षमता चाचणीस १० आणि तोंडी मुलाखतीस १० गुण आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेत किमान १५ गुण मिळवणे आवश्यक असल्याचे जाहिरातीत नमूद आहे.

सुरुवातीला अर्ज करताना कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून, अल्पसूचीत (Shortlist) समाविष्ट झालेल्या उमेदवारांनाच पुढील टप्प्यावर २०० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट अथवा पोस्टल ऑर्डर सादर करावी लागणार आहे. हे शुल्क ना-परतावा असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.

इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या स्वप्रमाणित प्रतींसह फक्त स्पीड पोस्टाद्वारे पाठवायचा आहे. अर्ज १० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी संबंधित कार्यालयात पोहोचणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :
प्रबंधक (प्रशासन),
मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद,
जालना रोड, छत्रपती संभाजीनगर – ४३१००९.

अर्जाच्या पाकिटावर “स्वयंपाकी या पदाकरिता अर्ज” असे स्पष्टपणे नमूद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शैक्षणिक कागदपत्रे, जन्मतारखेचा पुरावा, लागू असल्यास जात व दिव्यांग प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, स्वयंपाकाचा अनुभव प्रमाणपत्र, आधार कार्ड आदी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

जाहिरातीनुसार, भरती प्रक्रियेतील पुढील वेळापत्रक व इतर सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात व त्यातील सर्व अटी-शर्ती तपासणे आवश्यक आहे.

टीप : वरील माहिती दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील नमूद तपशीलांवर आधारित आहे. भरती प्रक्रियेतील कोणताही बदल, सुधारणा किंवा पुढील सूचना संबंधित उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होऊ शकतात.

WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात