Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

श्रीरामपुरात भंगार दुकानांवर पोलिसांची धडक कारवाई; सहा व्यावसायिकांवर गुन्हे


श्रीरामपूर | प्रतिनिधी

श्रीरामपूर शहरात पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अंतर्गत भंगार दुकानांची तपासणी करत कारवाई केली. या कारवाईदरम्यान वाहनांचे कागदपत्रे, मालकीहक्क तसेच भंगार साहित्याच्या स्रोताबाबत तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये काही प्रकरणांत आवश्यक कागदपत्रांबाबत समाधानकारक माहिती उपलब्ध नसल्याचे आढळून आल्यानंतर सहा भंगार व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.

पोलिसांच्या या कारवाईदरम्यान भंगार दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहनांशी संबंधित साहित्य आढळून आले. त्यामध्ये 34 पेक्षा अधिक चारचाकी वाहने, तीन ट्रॅक्टर, 25 इंजिन, 50 गिअर बॉक्स आणि 30 रेडिएटर यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. याशिवाय विविध वाहनांचे सुटे भाग व इतर भंगार साहित्याचीही तपासणी करण्यात आली.

चोरीची वाहने किंवा चोरीच्या वाहनांचे सुटे भाग भंगार बाजारात विक्रीसाठी येऊ नयेत, यासाठी भंगार व्यावसायिकांनी साहित्य खरेदी करताना त्याची मालकी, कागदपत्रे आणि स्रोताची पडताळणी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

या कारवाईमुळे शहरातील भंगार व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. संशयास्पद वाहन किंवा वाहनांचे सुटे भाग आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

दरम्यान, गुन्हे दाखल झालेल्या प्रकरणांचा पुढील तपास सुरू असून, तपासातून वाहनांचे व जप्त साहित्याचे मूळ तसेच त्यासंबंधीची कागदपत्रे स्पष्ट होणार आहेत.

महत्त्वाचे : संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याचे वृत्त असले तरी न्यायालयीन निर्णय होईपर्यंत त्यांना दोषी ठरविता येत नाही. प्रकरणातील अंतिम तथ्य तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल.

WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात