Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

आषाढी वारीसाठी सोलापूर जिल्ह्यातील चार नगरसंस्थांना १८.८६ कोटींचा निधी; पंढरपूरच्या विकासकामात बदल

सोलापूर : आषाढी वारी २०२६च्या तयारीसाठी पंढरपूर नगरपरिषद, अकलूज नगरपरिषद, माळशिरस नगरपंचायत आणि नातेपुते नगरपंचायतींसाठी मंजूर करण्यात आलेल्या १८.८६ कोटी रुपयांच्या निधीच्या विकासकामांमध्ये सुधारणा करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. नियोजन विभागाने १४ ऑगस्ट २०२६ रोजी याबाबत शासन शुद्धीपत्रक जारी केले आहे.

पंढरपूर नगरपरिषदेसाठी मंजूर कामांमध्ये शहरातील विविध ठिकाणी सुशोभीकरण, रस्त्यांचे काम, मलनिस्सारण व्यवस्था, हायमास्ट, विद्युत रोषणाई, सीसीटीव्ही व्यवस्था, विद्युतीकरण, स्वच्छतागृहांचे अद्ययावतीकरण आणि आपत्कालीन व्यवस्था केंद्र यांचा समावेश आहे. पंढरपूरसाठी एकूण १७.०५ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, पंढरपूर नगरपरिषदेच्या यापूर्वी मंजूर केलेल्या ७५ लाख रुपयांच्या दिशादर्शक फलकांच्या कामाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी दर्शन रांग रोड आणि भक्तनिवास रोड येथे पुरेशी विद्युत व्यवस्था करण्यासाठी २५ लाख रुपयांच्या नवीन कामाला मंजुरी देण्यात आली आहे.

अकलूज नगरपरिषदेसाठी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर रस्ते, पालखी मार्ग, दिवाबत्ती, स्वच्छतागृहे, स्नानगृह परिसर आणि आरोग्यविषयक कामांसाठी ८० लाख रुपये मंजूर आहेत.

माळशिरस नगरपंचायतीसाठी पालखी मार्ग व परिसराचे मुरमीकरण, आरोग्यविषयक कामे, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, मंडप, आपत्कालीन मदत केंद्र आणि वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा यासाठी ४६ लाख रुपये तरतूद आहे. नातेपुते नगरपंचायतीसाठी पालखीतळ परिसरातील मुरमीकरण, स्वच्छता, आरोग्यविषयक कामे, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, दिवाबत्ती, आपत्कालीन केंद्र आणि वारकऱ्यांसाठी सुविधांसाठी ५५ लाख रुपये मंजूर आहेत.

या सर्व कामांसाठी मंजूर निधी त्याच उद्देशासाठी वापरला जावा, कामे गुणवत्तेनुसार पूर्ण झाली आहेत याची खातरजमा करावी आणि कोणत्याही कामाची दुबार मंजुरी होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा अटी शासनाने घातल्या आहेत.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या निधीतून विविध विकासकामे करण्यात येणार आहेत.
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात