कारेगावच्या सरपंचाने मागितली जलजीवन मिशनच्या कामामध्ये टक्कवारी
ठेकेदार निलेश निमसे यांची कारवाईची गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी
श्रीरामपूर-
तालुक्यातील कारेगावचे सरपंच आनंद वाघ यांनी ग्रामपंचायत सदस्य सुनील पटारे यांच्यामार्फत जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा पुर्नजोडणी कामामध्ये ३ टक्के रक्कम मागितली. शिवाय उसणवारीच्या नावाखाली ४९ हजार रूपयेही उकळले. ते परत केले नाही. रक्कम न दिल्यास उपोषणास बसण्याचा इशारा दिला, असा आरोप करून वाघ व पटारे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कामाचे ठेकेदार निलेश निमसे यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, १ जून २०२२ रोजी जलजीवन मिशन अंतर्गत मौजे कारेगाव येथील नळ पाणीपुरवठा पुर्नजोडणी (रेट्रो फिटींग) चे काम मला मिळाले होते. सदर काम पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाच्या देखरेखीखाली पूर्ण करून जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता यांच्या पाहणीने अंतरीम अहवाल तयार करून माहे नोव्हेंबर २०२२ अखेर या कामाचे संपूर्ण बील मला मिळाले असून काम चालू होते त्या दरम्यान कारेगाव येथील सरपंच आनंद वाघ यांनी वेळोवेळी मला उसणे पैसे द्या, माझे मेहुणे यांचा अपघात झाला आहे.
त्यासाठी मला मदत करा. असे म्हणत पैशांची मागणी केली. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य सुनील पटारे यांनी वेळोवेळी सांगितले की, सरपंच यांना अडचण आहे. त्यांना काही पैसे द्यावे लागतील. वाटल्यास मी मध्यस्थती करतो. त्यांची अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा पैसे परत करायला सांगतो, असे म्हणत स्वतःच्या दुकानच्या (श्रीराम हार्डवेअर, कारेगाव) नावाने एनएफटी करून मी त्यांना ४९ हजार रूपये (एकूनपन्नास हजार रूपये) दिले. परंतू ते पैसे परत देण्याचे तर सोडाच परंतू काम पूर्ण झाल्यावर त्यांनी मला वेळोवेळी निरोप पाठविले. पूर्ण हिशेबाने ३ टक्के प्रमाणे पैसे मला पाठवा. अन्यथा मी तुमच्या कामाची सी. ओ. यांच्याकडे तक्रार करील. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.
मागील महिन्यात सुनील पटारे यांचा वाढदिवस होता. पुन्हा त्यांनी वाढदिवसाचे फलक व इतर खर्चासाठी पैशाची मागणी केली. मी देण्यास नकार दिला असता त्यांनी चौकशीचे पत्र तयार करून व्हॉट्सॲपला प्रसिद्ध केले. तरीही मी त्यांच्या अशा पोकळ धमकीला घाबरलो नाही. मग त्यांनी उपोषणाला बसण्याचे निवेदन देउन त्याच्या बातम्या तयार केल्या. एका खासगी वृत्त वाहिणीला आमच्या कामाचे व्हीडिओ शुटींग काढून मुलाखती दिल्या. त्यामध्ये पाईपलाईन लिकेज दाखवली. ती पाईपलाईन भारत निर्माण योजनेतून सहा ते सात वर्षांपूर्वी गावात झालेल्या योजनेचे लिकेज व्हीडिओमध्ये दाखविले आहे.
आमच्या लाईनला कुठेही लिकेज आज नाही. आणि एक वर्षभर देखभाल दुरूस्ती काळ असल्याने कुठे काही रस्त्याच्या कडेला अपघाताने शेजारील शेतकऱ्याने पाईपलाईन नेताना किंवा जिओ पोर्टलची लाईन खोदताना त्यांच्याकडून जरी आमच्या लाईनला धक्का लागल्यास आम्ही स्वतः त्या दुरूस्त करून देत आहोत. असे असताना मी सुशिक्षीत बेरोजगात अभियंता असून मी हे जे काम करतो त्या कामाच्या पैशांमधून माझा उदर्निवाह चालतो. त्या नफ्यातून मी ३ टक्के प्रमाणे रक्कम सरपंच कारेगाव यांना देऊ शकत नाही. तरी आपण माझ्या या तक्रारीची दखल घेऊन कारेगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आनंद गोरक्षनाथ वाघ व सदस्य सुनील गंगाधर पटारे यांच्यावर पैसे मागितल्याप्रकरणी योग्य ती कारवाई करावी, असे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, मुख्य कार्याकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा पषिरद, उपअभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, श्रीरामपूर, पोलिस उपअधिक्षक, श्रीरामपूर उपविभाग आदींना दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment