श्रीरामपूर | प्रतिनिधी
श्रीरामपूर शहरातील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबय्या यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज श्रीरामपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापारी, विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग घेत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.
शनिवारी घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर उशिरा मिळाल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले. या हल्ल्यात हॉटेल मालक आकाश दुबय्या यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबीयांसह इतर काही जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात काही आरोपींना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.
आज सकाळपासून शहरातील मुख्य बाजारपेठा, व्यावसायिक आस्थापने आणि अनेक दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. शहरात शांततेचे वातावरण राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नागरिकांनी आरोपींना कठोर शिक्षा, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण आणि शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी केली. या घटनेमुळे श्रीरामपूरसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून व्यापारी वर्गातही तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
— इंडियन न्यूज ई-ग्राम
No comments:
Post a Comment