अशोक‘ चे संचालक सोपान राऊत यांच्याकडून महिला पालकांच्या गोपनियतेचा भंग
ग्रामपंचायत सदस्या संगीताताई मांजरे यांचा उपोषणाचा इशारा
श्रीरामपूर प्रतिनिधी : अशोकनगर येथील रयत शिक्षण संस्थेचे भास्कराव गलांडे पा.माध्यमिक विद्यालयाच्या स्कूल कमिटिचे अध्यक्ष तथा अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक सोपान राऊत यांच्याकडून पदाचा गैर वापर केला जात असून विद्यालयाच्या मुख्याध्यापकांवर राजकीय दबाव आणून महिला पालकांची खासगी माहिती घेतल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याबाबत निपाणी वडगांवच्या ग्रामपंचायत सदस्या संगीताताई मांजरे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग प्रमुखांकडे याबाबत तक्रार केली असून राऊत यांच्यावर कारवाई न केल्यास 26 ऑगस्ट रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अशोकनगर येथील भास्कराव गलांडे पा. विद्यालयात मागील वर्षी सोपान राऊत यांची स्कुल कमिटी अध्यक्ष म्हणून निवड झाली. यापूर्वी चे अध्यक्ष यांनी कधीही शालेय पातळीवर राजकारण केले नाही. शाळेच्या विकासात्मक बाबीकडे लक्ष देण्याऐवजी सध्याचे अध्यक्ष राऊत यांनी मात्र आपले राजकीय वजन वापरून विद्यालयाच्या मुख्याध्यापकांवर दबाव टाकीत आहेत. त्यांनी संगिता मांजरे यांची खासगी माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर ते करू शकतात अशी भिती आहे.
अध्यक्ष राऊत हे शाळेचा वापर आपल्या कार्यकर्त्यांची उठबस करण्यासाठी तसेच शालेय पातळीवरील खाजगी रेकॉर्ड अनधिकृत तपासून त्यात त्रूटी पाहून एखाद्या महिला पालकाला वेठीस धरून त्या माहीतीचा वापर राजकीय व सामाजिक दबावासाठी करीत आहे. राजकीय कूरघोड्या करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांचा वापर होत असल्याने व कायद्याने सर्वसामान्य जनतेचे खाजगी जीवनातील माहिती अबाधित ठेवण्याची नियमात सक्त तरतुद केलेली आहे. परंतु खालच्या पातळीवर राजकारण करण्याची सवय असणाऱ्या लोकांनी आता सर्वसामान्य जनतेच्या तेही स्वतंत्र हिरावुन घेण्याचे उद्योग उभारले आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.
या सर्व बाबींचा बिमोड करण्यासाठी व गावातील नागरिकांच्या हितासाठी व शाळेच्या मुख्याध्यापकांना बेकायदेशीर कामे करण्यास भाग पाडल्याप्रकरणी अध्यक्ष राऊत याची तात्काळ अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी मांज़रे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विभाग प्रमुखांकडे केली आहे. कारवाई न झाल्यास लोकशाहीच्या रक्षणासाठी 26 ऑगस्ट रोजी रयत शिक्षण संस्थेच्या अहमदनगर येथील उत्तर विभागीय कार्यालयात उपोषण सुरू करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्या संगीताताई मांजरे, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल उंडे, नानासाहेब मांजरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भागचंद नवगीरे यांच्यासह इतर ग्रामस्थांनी दिला आहे.
निवेदनाच्या प्रती रयत शिक्षण संस्थेचे सातारा येथील सचिव, कोतवाली पोलिस ठाणे, अहमदनगर यांना पाठविण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment