श्रीरामपूर (प्रतिनिधी):
प्रकृती परीक्षण अत्यंत महत्त्वाचे असून त्यातून आपण सजग होऊन निरोगी राहू शकतो व योग्य उपचाराने होणाऱ्या संभाव्य रोगांचा मुकाबला करू शकतो. आयुष्यात सुरुवातीपासूनच प्रत्येकाने जागरूकता व योग्य उपचार घेतले तर पुढील आयुष्य सुखकर बनू शकते यात शंका नाहीअसे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर यांनी केले.
आयुर्वेद महाविद्यालय, राहुरी व डाकले महाविद्यालय, श्रीरामपूरच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित विद्यार्थी व शिक्षकांना आरोग्य तपासणी व सल्ला शिबिरामध्ये अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने भारतातील नागरिकांना दिलेली ही एक सुवर्णसंधी आहे त्याचा सर्वांनी लाभ घेत आपल्या प्रकृतीचे परीक्षण करून घ्यावे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
डॉ स्नेहा भोकरे, सहाय्यक प्राध्यापक, क्रिया शरीर विभाग, आयुर्वेद महाविद्यालय, राहुरी या आपल्या मनोगतात म्हणाल्या की, जेनेटिक्सवर आपले आरोग्य अवलंबून असते. ५००० वर्षांपूर्वी आयुर्वेदाने संपूर्ण जगाला निरोगी व निकोप जीवन जगण्याचा मार्ग दाखवला आहे त्याचा आपण सर्वांनी अवलंब केला पाहिजे. आपली प्रकृती ही आपला स्वभाव व आपला आयुष्य घडवते त्यामुळे तिच्याकडे धकाधकीच्या जीवनात सकारात्मक व गंभीरतेने पाहण्याची गरज निर्माण झालेली आहे.
प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य, डॉ महेंद्र बोर्डे, विभाग प्रमुख व सहयोगी प्राध्यापक, संहिता, सिद्धांत आणि संस्कृत विभाग आयुर्वेद महाविद्यालय, राहुरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरातील सर्व सहभागी डॉक्टरांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रकृती परीक्षण या मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करून त्यांच्याशी चर्चा करून सल्ला दिला. या शिबिरासाठी डॉ. राजश्री वने सहाय्यक प्राध्यापक, रसशास्त्र विभाग, आयुर्वेद महाविद्यालय, राहुरी या उपस्थित होत्या. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुभाष देशमुख, प्रा. विजय दळवी, प्रा. प्रमोदकुमार राऊत, प्रा. शिवप्रसाद त्रिपाठी, प्रा. तसनीमआरा शेख, प्रा. प्रतिभा शेटे, प्रा. नीता थोरात व प्रा. वृषाली धोंगडे यांनी परिश्रम घेतले. डॉ. सादिक सय्यद यांनी शिबिराचे प्रास्ताविक केले. डॉ. संतोष घंगाळे यांनी सूत्रसंचालन केले.
No comments:
Post a Comment