शहर पेटलंय, पण प्रशासन थंड, गुन्हेगारीचा खेळ सुरूच..
चार दिवसांत ७ हल्ले, श्रीरामपूर पेटलं,गुन्हेगारीचा भस्मासुर बेभान
इंडियन न्यूज | प्रतिनिधी श्रीरामपूर शहरात गेल्या चार दिवसांत तब्बल सात हल्ल्यांच्या घटना घडल्या असून शहरात भीतीचे सावट निर्माण झाले आहे. रामनवमी यात्रेचा जल्लोष आणि सय्यद बाबा उर्सेची गर्दी सुरू असतानाच या रक्तरंजित घटनांनी शहराच्या प्रतिमेला गंभीर गालबोट लागले आहे.
शहरातील मुख्य चौक, गजबजलेले भाग आणि वर्दळीच्या ठिकाणीच सर्रास चाकू, कोयते आणि हत्यारांचा वापर होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. कधी, कुठे, कोणावर हल्ला होईल याचा काही नेम उरलेला नाही.
गुन्हेगारांचा माज – पोलिसांचा मौनव्रत
शहरात गुन्हेगारीचा भस्मासुर अक्षरशः बेभान झाला असताना पोलिस प्रशासन मात्र गांधारीची भूमिका घेत असल्याचा संताप व्यक्त होत आहे. वाढत्या हल्ल्यांवर अंकुश ठेवण्यात पोलिस अपयशी ठरत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
लोकप्रतिनिधींचा दबदबा संपला का?
खासदार-आमदार यांचा प्रशासनावर अंकुश उरलेला नाही, उलट प्रशासनच त्यांना गिनत नसल्याची चर्चा शहरभर रंगली आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना लोकप्रतिनिधी मात्र शांत असल्याने संताप आणखी वाढत आहे.
उत्सवांवर गुन्हेगारीचे सावट-
धार्मिक उत्सवांच्या काळात शांतता राखण्याऐवजी गुन्हेगारी डोके वर काढत असल्याने श्रीरामपूरची कायदा-सुव्यवस्था धोक्यात आल्याचे चित्र आहे.
नागरिकांचा सवाल.पोलीस आणि प्रशासन जागे होणार तरी कधी? की अजून मोठी घटना घडल्यावरच हालचाल होणार? असा संतप्त सवाल आता शहर वासियांकडून विचारला जातोय...
No comments:
Post a Comment